Saturday, March 7, 2020

जागतिक महिला दिन २०२०

दिवाळी उपक्रमानित्मिताने सजीता आणि 'सजग'च्या मुलांची भेट झाली .कार्यक्रम आटोपल्यावर तिने सहज विचारलं कि या मुलांच्या आईना पण शिकायची इच्छा आहे तु जॉईन होशील का ?
सुरुवातीला ५० तरी बायका उत्सुक आहेत असं कळल पण अनुभवाप्रमाणे १०-१२ जणीच आल्या.पहिला सेशन होतांना काहीच अंदाज नव्हता कि पुढे काय होणार आहे? आम्हाला कोणत्या पद्धतीने शिकवायचे आहे किंवा त्यांना नक्की काय शिकायचे आहे? ढोबळमानाने अक्षर ओळख पासून सुरुवात करू अस मला वाटला होत.
पण चक्क तसं न होता फार मजेदार पद्धतीने सजिताने सुरुवात केली त्याने त्या सगळ्या ताई आणि मी सुद्धा जोडले गेलो.
 introduction सेशन उत्तम पार पडल्यावर त्यांना येणाऱ्या अडचणी   विचारल्या त्यांना शिक्षणाची निकड का भासते आहे त्याबद्दल विचारलं.   बँक चे फॉर्म भरता येत नाहीत, लोकांकडून भरावे लागतात.तसेच इतर   योजनाचे फॉर्म्स, शाळेचे फॉर्म ,नोटीस न वाचता येणे ,मुलांना अभ्यासाला   बसवलं तर एवढ तरी वाचून दाखव मग बसतो अस मुलांनी सांगणे.   किराणा सामान यादी लिहिता येत नाही म्हणून घरच्या लोकांनी हसणे.   सर्वात महत्वाची अडचण होती ती म्हणजे whatsappचे मेसेज वाचता न   येणे 😃
ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टी त्यांना शिक्षणाच्या सकारात्मक कडे घेऊन आल्या आणि त्यांच्या सोबत मी सुद्धा  माझ्या वेळेचा सदुपयोग करण्याचा श्री गणेशा केला.
सगळ्या ताईना थोडीफार अक्षर ओळख होती अस नव्हतं काहीना जोडाक्षरे वाचता येत होती तर काहीं कधीही शाळेत न गेलेल्या ताईही इथे होत्या.
अक्षर ओळख बाराखडी पासून सुरु न करता रोजच्या स्वयंपाकातील, किराणा यादीसामानापासून सुरुवात केली. त्यासाठी chart बनवताना मलाही मजा आली. आमचा वर्ग नीट सुरु झाला. ह्या सगळ्या ताईसोबत मलाही खूप शिकायला मिळाले.
picture book session, एखादी साधी गोष्ट उदा. 'बाजारात जाणे' यावर त्यातील आधारित शब्द ,वाक्ये घेणे .त्यावर आधारित छोटेखानी नाट्य रुपांतर सादर करणे .ह्या सगळ्या वेगवेगळ्या activity त आम्ही सगळ्या ताई सोबत रमलो.
    माझ्यासाठी हा पूर्णपणे वेगळा अनुभव ठरला. त्यांच्यासाठी तास design करणे , वेगवेगळ्या activity च्या कल्पनांचा विचार करणे.गोष्ट निवडणे . chart presentation , conversational basedछोटेखानी नाटक plan करणे अश्या खूप साऱ्या activity ने दिवस व्यापला गेला .एखाद सेशन नीट घेता आले नाही तर त्यावर वाईट वाटणे सुरु झाले.त्यावर मात करत ते कस छान घेता येईल हा विचार सुरु झाला .माझ्या विचाराच्या,बुद्धीच्या कल्पना विस्तारल्या पण माझ्या अंगभूत मर्यादाही जाणवल्या ,जसे 'का' व' मा ' मधील फरक ओळखता  न येणाऱ्या ताईना मला शिकवता येईना.माझ्या गटात इंग्रजी सुरु झाले तेंव्हा माझ्याच इंग्रजीची बोंब आहे हे माझ्या लक्षात यायला लागले.कुठेही Indian standard time प्रमाणे जाणारी मी आता क्लासला वेळेत पोहचण्यासाठी धडपडू लागले. 😀
   शिकवणे ...त्यातही सोप्या पद्धतीने समोरच्याला कंटाळा न आणता शिकवणे हि फार कठीण गोष्ट आहे ,रंजक पद्धतीने शिक्षण boring होणार नाही अश्या पद्धतीने शिकवणे सजीताला उत्तम जमत तिच्याकडून मी खूप शिकतेय.
       आधी 'नाटक' अस नुसत नाव काढल तरी  घाबरणाऱ्या ताई आता मात्र उत्साहाने त्यात भाग घेऊन बसवताना दिसतात. video शूट ला हि घाबरत नाहीत. कुठल्याही activityला तयार असणारा असा आमचा 'प्रौढ शिक्षण वर्ग' आहे .बचती चे महत्व , आर. डी. योजना , बँक account माहिती , पेन्शन योजना असो कि लायब्ररी activity musical chair च्या रुपात खेळणे असो तर कधी नुसता dance त्यातही झिंगाट असो कि गरबा ,कधी आपुलकीच्या गप्पा असो तर कधी चक्क शाब्दिक चकमक 😂 असा आमचा वर्ग आम्हाला  भरपूर एनर्जी देतो. सगळ्या ताईना सुद्धा वर्ग चुकला तर वाईट वाटते. 
विहारात जेव्हा वर्ग सुरु केला तेंव्हा वाटलं होता की इतक्या जवळ वर्ग असेल तर खूप ताई येतील आजूबाजूच्या वस्ती तील ...पण अस झालं नाही.बऱ्याचजणीना शिकण्याची ओढ आहे कारण आमच्या वर्गात नवनवीन enrollment होत राहते पण ती कायम टिकत नाही.कारण त्या वर्गात येण्यासाठी त्यांना बरेच अडसर पार करून यावे लागते .बहुतेक जणी कामाला जातात तिथून दुपारी ३ पर्यंत  परत येतात , काहीतरी पटकन खाऊन किंवा नुसता चहा घेऊन ४ च्या वर्गाला हजर राहतात. काहींची तर संध्याकाळची कामे सुद्धा आहेत.५ च्या ठोक्याला परत जावेच लागते.कामाची ठिकाण लांब आहेत घरी गाडी असली तरी घरचे कोणी शिकवत नाहीत कि देत नाहीत,इतक्या लांब चालत जातात आणि येतात. ह्या साठी मागच्या आठवड्यात activa चालवण्याचे प्रशिक्षण दिले त्यात १० जणी नी भाग घेतला त्यात ६ जणी ना आता गाडी चालवता येतेय.😊
 काहीना छोटी मुले आहेत त्यांना सांभाळण्यासाठी कोणतीही सपोर्ट सिस्टीम नाही.त्यामुळे त्या रेग्युलर येऊ शकत नाही.काही जणी आता या वयात शिकून काय करायचं अश्या विचाराच्या तर ह्या वर्गात येणाऱ्या ताईना हसणारे हि बरेच आहेत. आज २०२० उजाडले तरी स्त्रियांची परिस्थिती फार बदललेली नाही ,वूमन्स डे निमित्ताने तर हे फार जाणवत.
स्वत:च्या न्यूनगंडावर मात करत ...लोक काय म्हणतील इ. इतक्या अनेक अडथळ्यावर मात करत  रेग्युलर ताईची पटसंख्या १०-१२ जणींची आहे. ७ नोव्हेंबरपासून ते आज मार्च उजाडला तरी आमचा वर्ग छान सुरु आहे.जेमतेम एक माणूस जाईल अशा गल्लीतून वाट काढत डोक्यावरची छप्परे चुकवत सगळ्या ताईच्या घरी जातो. एक खोली आणि छोटा व्हरांडा अस छोटेसे घर जरी असले तरी त्यांचे मन मात्र फार मोठे आहे. वर्ग झाल्यावर चहा बिस्कीट चा आग्रह ठरलेलाच. सजिताला अवार्ड मिळाले तर तिचे कौतुक फुलांचा गुच्छ आणि पेढे देऊन करणाऱ्या आणि मलाही वाढ दिवसाला फुल, हाताचे घड्याळ देऊन कौतुक करणाऱ्या आमच्या सगळ्या ताई गुणी आहेत.
  ह्या सगळ्या उपक्रमात माझा खारीचा वाटा आहे पण तरीही आज  ८ मार्च २०२० रोजी मी पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा करतेय असं वाटतय. असा हा सार्थकी लागलेला महिला दिन तुमच्याही वाट्याला येवो हि शुभेच्छा !

Trupti
Volunteer
SAJAG



HAPPY WOMAN'S DAY TO ALL💐 😃

No comments:

Post a Comment