Friday, November 20, 2020

ऑनलाइन शिकवण्याची गुणवत्ता - 'सजग' शिक्षक सर्वेक्षण ऑक्टोबर 2020

 

शाळेत प्रत्यक्ष होणार्या वर्गापासून दूर राहून 6 महिन्यांहून अधिक काळ लोटल्यांवर शिक्षक परत वर्ग पुन्हा सुरू करण्यास तयार आहेत का? शैक्षणिक समस्यांवर काम करणाऱ्या, कल्याणमधील सजग या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात सुमारे 67% शिक्षकांनी प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यासाठी उत्सुक असल्याचा आपला कल व्यक्त केला आहे. ऑनलाईन शिक्षणाचा शिक्षकांचा अनुभव जाणून घेण्यासाठी ऑक्टोबर २०२० मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात 65 शिक्षकांनी स्वेच्छेने त्यांच्या प्रतिक्रिया गुगल फॉर्ममध्ये रेकॉर्ड केल्या. सर्वेक्षणात भाग घेतलेले 57% शिक्षक कल्याण पश्चिमेतील होते (जिथे सजगचे शैक्षणिक प्रकल्प आहेत), 29% शिक्षक मुंबई आणि मुंबई उपनगरातील आणि उर्वरित शिक्षक महाराष्ट्रातील इतर भागातील होते.

शिक्षकांनी शारीरिक वर्ग पुन्हा सुरू करण्याची तयारी दर्शविली त्याचा तपशील आकृती 1 मध्ये आहे. शिक्षकांनी अशी तयारी दाखवण्याच्या मागे अनेक कारणं असू शकतात, जसं ऑनलाइन वर्ग आयोजित करण्यात असणाऱ्या अडचणी किंवा कोविड -19 ची भीती कमी झाली. ऑनलाइन वर्ग आयोजित करण्यात येणा-या अडचणी ह्या मुद्द्याचा ऑनलाइन सर्वेक्षणात सविस्तर तपास केला गेला.


आकृती  1

 ऑनलाइन वर्गातील सर्वात मोठी मर्यादा म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात सहभाग घेता येत नाही. 73% शिक्षकांनी असे उत्तर दिले कि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन वर्गांसाठी आवश्यक डिजिटल पायाभूत सुविधा नाहीत. म्हणजे ते त्यांच्या 100% विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. सर्व विद्यार्थ्यांकडे डिजिटल पायाभूत सुविधा असल्याचे नमूद करणाऱ्या शिक्षकांपैकी 67% शिक्षक हे खासगी शाळांमधील होते. परंतु सर्व खाजगी शाळेतील शिक्षक त्यांच्या 100% विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. मुंबई आणि मुंबईच्या परिघावरील कल्याण इथे, जर जवळपास ७५% शिक्षक हे आमचे सारे विद्यार्थी ऑनलाईन वर्गात डिजिटल सुविधांच्या अभावाने येऊ शकत नाहीत असे म्हणत असतील तर महाराष्ट्राच्या सुदूर भागात अधिक वाईट अवस्था असेल अशीच शक्यता आहे. 

ऑनलाइन वर्ग दोन प्रकारे घेतले जातात. झूम किंवा गूगल मीट अ‍ॅपचा वापर करून लाइव्ह ऑनलाइन वर्ग किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर प्री-रेकॉर्ड केलेले व्हिडिओ पाठवणे. सर्व्हेतील 81% शिक्षकांनी लाइव्ह ऑनलाईन वर्ग घेतले तर उर्वरित शिक्षकांनी पूर्व-रेकॉर्ड केलेले व्हिडिओ पाठविले. ही दुसरी पद्धत मुख्यतः प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक वापरतात. ही दुसरी पद्धत साहजिकच कमी गुणवत्तेची आहे. विद्यार्थ्याला किती समजले आहे ह्याचा विद्यार्थी किंवा पालक ह्यांनी दिल्याशिवाय कुठलाही feedback शिक्षकाला ह्या पद्धतीत मिळत नाही. मुळातच ऑनलाईन वर्गातही विद्यार्थी सहभाग आणि feedback ह्यांवर मर्यादा येतात. प्री-रेकोर्ड व्हिडीओमध्ये सहभाग आणि feedback अजूनच घटतात. अर्थात वयाने लहान विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात बसवणे, हे पालकांच्या सातत्यपूर्ण सहभागाशिवाय कठीण आहे, कदाचित ते योग्यही नाही. जिथे पालकांना पाल्यासोबत सातत्याने वर्गात राहणे शक्य नाही तिथे कंटेंट पाठवायचा मार्ग निवडला गेला असावा. ऑनलाईन वर्गात येणाऱ्या अडचणींचा आढावा आकृती 2 मध्ये देण्यात आला आहे.

         

आकृती  2: ऑनलाईन वर्गात येणाऱ्या अडचणी

त्याचप्रमाणे शिक्षकांनाही ऑनलाइन वर्ग सुरू ठेवताना काही अडचणी येतात, ज्याचे तपशील आकृति 3 मध्ये दिले आहेत. इंटरनेट कनेक्टिव्हिटीचे आव्हान शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही होते. शिक्षकेतर आणि घरातील कामे यासारख्या इतर जबाबदा्या म्हणजे शिक्षकांसाठी ऑनलाईन वर्ग घेण्यास अडथळे होते. शिकवताना साधनं न वापरता येणे ही दुसरी अडचण होती. विद्यार्थी व शिक्षक दोघानाही ही नवीन साधनं कशा प्रकारे वापरायचे ह्याची ओळख होणास पण खूप अडचणी निर्माण झाल्या. ऑनलाइन वर्गाची सर्वात मोठी मर्यादा म्हणजे गृहपाठ तपासणे आणि विद्यार्थ्यांच्या आकलनावर  अभिप्राय (feedback) देणे. 68.7% शिक्षकांनी नमूद केले की विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या कामाचे मूल्यांकन करणे कठीण होते. मूल्यांकन हा अध्यापनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्वत:हून अभ्यास न करणा-या विद्यार्थ्यांना प्रेरित करणे ऑनलाइन मोडमध्ये कठीण आहे.

 

       आकृती  3: ऑनलाईन क्लासेस दरम्यान शिक्षकांना येणाऱ्या अडचणी

सर्व्हेत सहभागी शिक्षकांपैकी जवळपास ७% शिक्षकांना वाटते आहे कि ते प्रत्यक्ष वर्ग आणि डिजिटल वर्ग ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करू शकतात. हे चांगले लक्षण आहे. आता जेव्हा शाळा प्रत्यक्षात सुरू होतील तेव्हा कदाचित काही विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गांत येतील आणि काही नाही असेच होण्याची शक्यता आहे. समजा, अशाही अवस्थेत शाळा सुरू झाल्या तर शिक्षकांना दोन्ही प्रकारे शिकवावे लागू शकते. त्यांना असे करण्याचा आत्मविश्वास आहे ही चांगलीच गोष्ट आहे.

सर्व्हेतील ढोबळ प्रश्नांना आलेल्या प्रतिसादावरून हे स्पष्ट दिसते आहे कि ऑनलाईन शिक्षण हा आपत्कालीन पर्याय होता आणि शिक्षणाची प्रक्रिया जिवंत ठेवणे एवढ्याच माफक उद्दिष्टासाठी तो वापरला जाऊ शकतो. आरोग्याचा धोका घटल्यावर जितक्या वेगाने आपण हा आपत्कालीन पर्याय बंद करू तेवढे आपल्या फायद्याचे आहे. बरेच शिक्षक ह्या आपत्कालीन पर्यायाकडून मूळ पद्धतीकडे जायला तयार आहेत हे चांगलेच लक्षण आहे.

--

सर्वसामान्य शालेय शिक्षणव्यवस्थेचा उद्देश हा असतो कि विद्यार्थ्यांतील स्वयंप्रेरणा (nature) आणि घरातून मिळू शकणारे पाठबळ (nurture) ह्यांतून विद्यार्थ्यांच्या आकलनात आणि विविध क्षमता शिकण्यात जी स्वाभाविक तफावत येते त्याला शिक्षकांच्या सहभागाने मर्यादित करणे आणि विद्यार्थ्यांना किमान गुणवत्तेचे आर्थिक, सामाजिक, राजकीय जीवन जगायला आवश्यक क्षमता देणे. शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी येणारा सातत्यपूर्ण आणि जिवंत संपर्क आणि विद्यार्थ्यांची परस्पर मैत्री आणि चढाओढ ह्यामुळे शाळांतून विद्यार्थी घडतात. दुर्दैवाने कोव्हीड-१९ च्या काळात ऑनलाईन शिक्षणाने शाळांची भूमिका अत्यंत मर्यादित, केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाईन माध्यमाने विद्यार्थ्यांपर्यंत नेणे, अशी करून ठेवली आहे. अशा ऑनलाईन शिक्षणात पालकांचा वारसा आणि स्वाभाविक क्षमता हेच घटक बलवान ठरणार आहेत. ह्या घटकांच्या अनुसार विद्यार्थी आकलनात मागे (learning loss) पडणार आहेत आणि विद्यार्थ्यांतील फरकही वाढणार आहे. कोव्हीड-१९ च्या काळात विद्यार्थी दशेत असणाऱ्या व्यक्तींच्या भविष्यातील कामगिरीत, त्यांच्या सुख-दुःखात ही विषमता कमी-जास्त प्रमाणात दिसून येणार आहे.    

त्यामुळे आकलनातील तफावत आणि वाढलेली शिक्षणाची दरी या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या शाळा पुन्हा सुरू केल्यावर आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. जेव्हा केव्हा शाळा सुरू होतील तेव्हा शाळा बंद (ऑनलाईन सुरू) असण्याच्या काळात निर्माण झालेली आकलन तफावत भरून काढण्याची मोहीम आपल्याला मोठ्या पातळीवर राबवावी लागेल. जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा लहान इयत्तांसाठी ‘जोडणारे वर्ग (bridge courses) राबवूनच त्यातील विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम शिकवला गेला पाहिजे. प्राथमिक कौशल्ये आणि आकलन ह्यांत अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन माध्यमात झालेले नुकसान भरून काढणे हे शाळा सुरू होण्याच्या सुरुवातीच्या कालावधीतच शक्य आहे. अन्यथा काही वर्षांनी जेव्हा कोव्हीड-१९ च्या काळांत शिक्षणाचे बाळकडू अर्धवट मिळालेल्या व्यक्ती समाजात सहभागी होतील तेव्हा त्यांच्या खुंटलेल्या वाढीबद्दल आपण काहीच करू शकणार नाही.